खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह अत्याचाराच्या गुन्ह्यात करवीर पोलिसांनी जेरबंद केलेल्या संशयिताने पोलिसांना हिसडा मारून सीपीआर आवारातून पलायन केले होते. रोहित ऊर्फ गणेश गुंडाजी नंदीवाले (22, रा.कोथळी, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. 15 रोजी सायंकाळी घडलेल्या घटनेची नोंद मात्र तब्बल पाच दिवसांनंतर दि. 19 रोजी रात्री लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली. मंगळवारी रात्री रोहित यास मिरज येथे पुन्हा पकडले असून बंदोबस्तात कोल्हापुरात आणले.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठाधिकार्यांनी गंभीर दखल घेतली असून करवीर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदारासह 6 जणांविरुद्ध पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे कसुरी अहवाल पाठविला आहे, असे करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी सांगितले. कर्तव्यातील कसुरीचा ठपका ठेवलेल्यांचे निलंबन शक्य आहे, असेही सूत्रांकडून समजते.
करवीर पोलिसांची गोपनीयता कशासाठी?
संशयिताने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना हिसडा देऊन पलायन केल्याच्या घटनेबाबत करवीर पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली होती. माध्यमांपर्यंत खबरबात पोहोचू नये, याचीही खबरदारी घेतल्याने पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. करवीरचे कॉन्स्टेबल महेश दिलीप नाईक यांनी दि. 19 रोजी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.
करवीर तालुक्यातील नात्यातील एका अल्पवयीन असलेल्या मुलीशी संशयिताची ओळख होती. तिच्याशी जवळीक साधण्याचा संशयिताने प्रयत्न केला होता. अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्या अपहरणाचा त्याने प्रयत्न केला. शिवाय तिच्यावर अत्याचारही केला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात संशयित रोहित ऊर्फ गणेश नंदीवाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित नंदीवाले याला करवीर पोलिसांनी दि. 15 रोजी सायंकाळी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला सायंकाळी सीपीआरमधील कुंभी बिल्डिंग येथे बंदोबस्तात आणले. नंदीवालेसमवेत अन्य एका गुन्ह्यातील पायाने शंभर टक्के अपंग असलेल्या शामराव नारायण सुतार यालाही वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस व्हॅनमधून आणले होते. सुतार याचा एक्सरे काढण्यासाठी त्याला रुग्णालयात नेले होते. यावेळी नंदीवाले पोलिस व्हॅनच्या मागील सीटवर बसला होता.
पोलिस मोबाईलवर व्यस्त असतानाच लघुशंका
बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले व्हॅनमधील काही पोलिस मोबाईलवर व्यस्त असतानाच संशयित रोहित ऊर्फ गणेश याने लघुशंकेला जायचे आहे, असे कारण पोलिसांना सांगितले. पोलिस लघुशंकेसाठी नेतानाच त्याने पोलिसाच्या हाताला हिसडा देऊन अंधाराच्या दिशेने पलायन केले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील गर्दीचा फायदा घेत तो पसार झाला होता. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह पथकाने शहरातील बस, रेल्वेसह रिक्षा थांब्यावरही संशयिताचा शोध घेतला. तो हाताला लागला नव्हता.
कुटुंबिय, नातेवाईक, मित्राकडे चौकशीचा ससेमिरा
संशयिताच्या शोधासाठी करवीर, स्थानिक गुन्हे अन्वेषण, जयसिंगपूर, शिरोळसह हातकणंगले व कुरुंदवाड पोलिस ठाण्याची यंत्रणा चार दिवसांपासून प्रयत्न करत होती. तरीही तो हाताला लागला नव्हता. कोथळी येथील त्याच्या नातेवाईकांसह मित्रांकडेही चौकशी केली; पण थांगपत्ता लागला नव्हता. मंगळवारी रात्री पोलिसांनी त्याला मिरज येथे पकडले. पोलिस बंदोबस्तात त्याला कोल्हापुरात आणले.
वरिष्ठाधिकारी अनभिज्ञ, चौकशीचे आदेश
या घटनेबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनाही घटनेची खबरबात नव्हती. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित हैदराबाद येथील प्रशिक्षणानंतर हजर झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ करवीर पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाचा चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
लवकरच कारवाई शक्य
संशयित पलायनप्रकरणी पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकार्यांसह पोलिसांची कसून चौकशी सुरू केली आहे. प्रथमदर्शनी कर्तव्यात कसुरीचा ठपका उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदारासह 6 जणांवर ठेवला आहे. पोलिस अधीक्षकांना अहवाल उपलब्ध झाला असून लवकरच कारवाई शक्य असल्याचे सांगण्यात आले.

