चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर आय ट्वेंटी कार आणि स्प्लेंडर दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात जाऊन पडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या अपघातात तेजस शिवाजी यादव (वय १८) आणि सोनाली पाटील (वय २९), रा. रेणावी हे भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही तातडीने उपचारासाठी विटा येथील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेणावी येथील तेजस यादव हा आपली बहीण सोनाली पाटील हिच्यासोबत स्प्लेंडर दुचाकीवरून रेणावीहून विट्याच्या दिशेने येत होता. त्याचवेळी विटा येथील रोहन संजय ढोबळे हे आय ट्वेंटी कारमधून विट्याकडून खानापूरच्या दिशेने जात होते. बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर दोन्ही वाहने समोरासमोर आली. त्यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात फेकली गेली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने बळवंत महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील भाऊ-बहीणीला नागरिकांकडून तातडीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे विटा-खानापूर मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
