खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी झाल्या आहेत.
मिरजेपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील आरग-बेडग मार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव मालवाहू मोटारीने मागून मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा जागीच किंवा तडफडून मृत्यू झाला, तर सुमारे २५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मृत व जखमी मेंढ्या या कोल्हापूर जिल्ह्यातील बोरगाव येथील मेंढपाळांच्या मालकीच्या आहेत. जून-जुलै महिन्यात कोल्हापूर परिसरात सतत पाऊस पडत असल्याने दरवर्षीप्रमाणे अनेक मेंढपाळ आपल्या कळपासह कमी पावसाच्या जत व सांगोला परिसरात स्थलांतर करतात. यंदाही ते तेथे काही काळ वास्तव्यानंतर पुन्हा आपल्या गावी परत निघाले होते.
परतीच्या प्रवासात गुरुवारी रात्री त्यांनी बेडग परिसरात मुक्काम केला होता. शुक्रवारी सकाळी मेंढपाळांच्या देखरेखीखाली मेंढ्यांचा कळप रस्त्याने पुढे जात असताना मागून आलेल्या भरधाव मालवाहू मोटारीने कळपाला जोरदार धडक दिली. या धडकेत अनेक मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर काही गंभीर जखमी मेंढ्यांचा नंतर तडफडून मृत्यू झाला. अनेक जखमी मेंढ्यांचे पाय मोडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या मालवाहू मोटारीच्या (ट्रक) चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. या अपघातामुळे मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि मेंढपाळांकडून करण्यात येत आहे. अपघातामुळे आरग-बेडग मार्गावर काही काळ वाहतुकीचीही कोंडी झाली होती.

