खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामदास पाटील (वय ३२) याचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या घटनेमुळे संपूर्ण मिरज पूर्व तालुका हादरला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
घटनास्थळ व पोलिस यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, मृत ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. आज रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. धारदार शस्त्राने गंभीर वार केल्यामुळे ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गेल्या काही दिवसांपासून सांगली शहर आणि जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मिरज तालुक्यातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, यामागे जुने भांडण किंवा टोळीयुद्ध असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून त्याची तपासणी केली, हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोनी-पाटगाव परिसरात सध्या चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
