- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
१४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिला मारहाण, मानसिक त्रास दिल्याबद्दल मुलीच्या वडिलासह, पती, सासू , सासरा, मध्यस्थी, पुजारी यांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे.
पीडित मुलीच्या आईचे निधन झाले आहे. तिचा सांभाळ वडील करतात. मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती.११ डिसेंबर २०२४ रोजी मुलीच्या वडिलांनी व मध्यस्थी भागा मावशी यांनी जबरदस्तीने तिचा विवाह भटजी विद्याधर ( पूर्ण नाव माहीत नाही) याच्या घरी लावून दिला. यावेळी तिचे सासू, सासरे उपस्थित होते. लग्नानंतर मुलीने पतीशी शरीर संबंध ठेवावे यासाठी तिला त्रास देऊ लागले.
तिने पतीशी संबंध ठेवण्यास नकार दिल्याने सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. काही दिवसांनी पीडित मुलीला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर तिने घडलेल्या प्रकार तिच्या चुलत्यांना सांगितला. त्यांनी पोलिसांचा ११२ नंबरवर तक्रार द्यायला सांगितले. पीडित मुलीने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी वडील, मध्यस्थी भागा मावशी, भटजी विद्याधर, पती, सासरा, सासू यांच्या विरोधात फिर्याद दिली.

