- झालेला प्रकार तडजोडीअंती मिटवण्यासाठी ‘त्या ‘ पोलिसाची कारभारात ढवळाढवळ..?
-
सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आल्याचे वारंवार चर्चेतून ऐकायला मिळत होते. काही महिन्यांपूर्वी ड्रग्स सापडले होते. कॅसिनो, मटका, गुटखा, चोरटी अवैध दारू विक्री, गांजा विक्री यासह कत्तलीसाठी गायींची वाहतूक या साऱ्यांचा अंदाज कुपवाड पोलिसांना असताना सुद्धा नाममात्र कारवाई करीत वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचे काम काही कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
कुपवाड मधील सह्याद्री स्टार्च चौक परिसरात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने अवैध व्यवसाय सुरू आहेत. संबंधित पोलिसाची अजून काही ठिकाणी व्यवसायात भागीदारी असल्याचे दोन नंबर धंदेवाले ‘खबऱ्या’ला सांगत आहेत. याच चौकातील अवैध धंदा करणाऱ्या व्यवसायिकाकडून तरुणाला मंगळवारी रात्री बेदम मारहाण करण्यात आली आहे. अभय निशिकांत चौगुले वय. ४० रा. समतानगर, मिरज असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी कच्ची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झाली होती. परंतु, मर्जीतल्या पोलिसाच्या वशिल्याने अवैध धंदा करणारा व्यावसायिक पुन्हा मुजोर भाषा करीत चौकात दहशत करत होता.
कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी बेधडक कारवाई करीत पानपट्टीतील सर्व माल बाहेर रस्त्यावर काढत दादागिरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी भेसळ असणाऱ्या विविध प्रकारच्या दारूच्या ५० पेक्षा जास्त बाटल्या सापडल्या. पोलिसांनी माल जप्त करीत दादागिरी करणाऱ्या संशयिताला पोलिस ठाण्यात नेले आहे. सपोनि भांडवलकर यांच्या या कारवाईमुळे मात्र व्यवसायात भागीदारी करणाऱ्या आणि अवैध व्यवसायिकांना पाठबळ देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

