- गारगोटी प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
गोव्याकडे कांदा-बटाटे घेऊन जाणाऱ्या टेंपोतून पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पिंपळगाव (ता. भुदरगड) येथे गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर मध्यरात्री ही घटना घडली. अमृत शिवाजी पाटील (वय २२, रा.शिंगणापूर) असे मृताचे नाव आहे. अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांत झाली.
पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांना शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालताना हा अपघात झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी संबंधिताच्या नातेवाइकांशी तत्काळ संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरम्यान, अपघातानंतर गोव्याकडे कांदा-बटाटे घेऊन जाणारा टेंपो आजऱ्यापर्यंत गेला होता. अमृत पाटील हा टेंपोत पोत्यावर पाठीमागे बसल्याचे सांगण्यात आले.
तोल गेल्याने तो टेंपोतून रस्त्यावर खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चहासाठी थांबले असता अमृत टेंपोत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शोध सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक लोंढे यांनी सांगितले. अमृतच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

