मिरज शहरातील कमानवेस परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पूर्ववैमन्यस्यातून तलवारीने हल्ला झाला. यात रक्ताच्या थारोळ्यात तो पडला आणि घटनास्थळी मृत्यू झाला. कुणाल दिनकर वाली असे त्याचे नाव असल्याचे समजते आहेत. तो नुकताच मोकातून जामिनावर आला होता. शहरात झालेल्या घटनेने खळबळ उडाली. मिरज शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. संशयितांनी पूर्वीच्या वादातून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मिरज शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून कमानवेसला ओळखले जाते. आज साडेदहाच्या सुमारास मृत वाली त्याठिकाणी आला होता. वाली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो नुकताच मोकातून जामिनावर आला आहे. जामिनावर मुक्त झाल्यापासून त्यांची आणि संशयिताची धुसफूस सुरू होती. तो कमानवेस चौकात आल्यानंतर संशयित हल्लेखोर त्याठिकाणी आले. त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी तलवारीने त्याच्यावर वार केले. वार इतके वर्मी होते की वाली हा रक्ताच्या थारोळ्यात पडला.
त्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, खुनाची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. पोलिस उपाधीक्षक, निरीक्षक यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. संशयित दोघांची नावे समोर आली असून, त्यांच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

