मिरज – खबऱ्या प्रतिनिधी |तालुक्यातील निलजी येथे चोरट्यांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे ७० हजाराचा ऐवज लुटला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. निलजी येथे शेतात कर्नाटकातील मजूर कुटुंब दोन लहान मुलासह वास्तव्यास आहे. शुक्रवारी मध्यरात्री चार चोरटे या मजूर कुटुंबाच्या घरात शिरले. सुमारे ३० ते ३५ वयोगटातील चोरट्यानी तोंडाला रुमाल बांधले होते. चोरट्यानी शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी केली. मात्र गरीब शेतमजूर दाम्पत्याने घरात काहीच नसल्याचे सांगत गयावया केली. यावेळी चोरट्यानी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, पायातील पैंजण, मोबाईल व लहान मुलांचे चांदीचे दागिने लुटले. त्यानंतर मजूराच्या घराच्या दरवाजाची बाहेरची कडी लावून चोरटे अंधारात निघून गेले.

यावेळी शेतमजूर दांपत्याने आरडाओडा केल्यानंतर काही वेळाने चौघेही चोरटे परत आले. यावेळी दोघांनी शेतमजुरास घराबाहेर नेले व दोन चोरटे घरात शिरले. दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून घरातील सहा हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर चारही चोरटे तिथून अंधारात पसार झाले. या घटनेमुळे शेतमजूर दांपत्य भयभीत झाले होते. याबाबत ग्रामीण पोलिसाना माहिती मिळाल्यानंतर पोलीस श्वानपथक घेऊन निलजी गावात पोहोचले. मात्र श्वानपथक तेथून घरापासून काही अंतरावर घुटमळले. चोरट्यांची एक दुचाकी पोलिसांना तेथे सापडली. दुचाकी मालकास शोधून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात जबरी चोरी व सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


