ग्रामपंचायतीने प्रिंटर दिल्याचे भासवले अन जि.प शाळेला फसवले..?
कवठेमहांकाळ – खबऱ्या प्रतिनिधी | बनेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेला प्रिंटर दिला असल्याचे भासविण्यात आले होते. प्रत्यक्षदर्शी प्रिंटर देण्यात आलेला नव्हता, जिल्हा परिषद शाळेला दिलेला प्रिंटर गेला कुठे..? हा सवाल उपस्थित झाल्यानंतर, मॅक्स इंडिया या डिजिटल मीडियामध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तत्कालीन “लाडक्या” ग्रामसेवकाने मंगळवारी दुपारी बनेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला तब्बल ३६ हजार रुपये किमतीचा प्रिंटर पोहोच केला आहे.

गायब झालेला प्रिंटर शाळेला पोहोच झाल्याने चर्चेला मात्र उधाण आले आहे. बनेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते किरण जगताप यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले होते. याबाबतची तक्रार प्रसिद्धी माध्यमांकडे केली होती. याची शहानिशा ‘मॅक्स इंडिया’च्या टीम ने केलेली होती. त्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आलेला ३६ हजार रुपयांचा प्रिंटर तत्कालीन ग्रामसेवकांनी लांबविला होता. या प्रकरणाची माहिती झाल्यानंतर गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी संबंधित तत्कालीन ग्रामसेवकाला मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रिंटर शाळेला पोहोच करण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकारी कुसुरकर यांच्या आदेशाने मंगळवारी दुपारी एका शिक्षकाच्या चार चाकीतून हा प्रिंटर निवांतपणे जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोचला.


