चौकशी समिती आज मालगावात..!
मिरज- खबऱ्या प्रतिनिधी | मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी मिरज पंचायत समिती समोर उपोषण सुरु होते. आंदोलक हे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनावर ठाम राहिल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी १६ जुलै रोजी आंदोलनकर्ते उपसरपंच तुषार खांडेकर व त्यांच्या साथीदारांना आश्वासित करत लेखी स्वरूपाचे पत्र दिले. सदरील पत्रामध्ये चौकशी समितीच्या प्राप्त अहवालानुसार ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील ) नियम १९६४ अन्वये प्रशासकीय कारवाई १० दिवसात करण्यात येईल असे लेखी स्वरूपात देण्यात आले होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे ह्या कडक शिस्तीच्या व न्यायप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी थेट लेखी स्वरूपात पत्र दिल्याने नमूद कालावधीत योग्य ती कारवाई करतील व आम्हास न्याय देतील असा विश्वास आंदोलनकर्ते उपसरपंच तुषार खांडेकर यांनी ‘गोपनीय खबऱ्या‘शी बोलताना व्यक्त केला.
उर्वरित दोन दिवसात कारवाई होईल या अपेक्षेने संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख चेहरे, संघटना, समित्या व कायद्याचे अभ्यासक यांचे लक्ष लागून राहिले आहे.उर्वरित कालावधीत याचा निर्णय न घेतल्यास आता मात्र जन उठावाची तयारी सुरु असल्याचे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय यंत्रनेकडूनच सांगण्यात आले.
दप्तर चारचाकीत, ग्रामसेवक अन सरपंच पतीची भटकंती..?
सध्या तालुक्यात बहुचर्चित असणाऱ्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ग्रामपंचायतीचे दप्तर हे चारचाकी वाहनातून अख्ख्या तालुक्यासह जिल्हाभर भटकंती करत फिरत आहे. या दप्तराच्या वाहनाचे सारथी चक्क सरपंच पती असल्याची जोरदार चर्चा आहे. “आम्हाला मदत करा” यासाठी धावा करत सर्वत्र पळत असल्याच्या अफवेने मात्र चांगलाच जोर धरल्याचे दिसून येत आहे.

आज चौकशी समिती मालगावात..!
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या प्रकरणात सखोल चौकशी होऊन अहवाल तयार करण्यात यावा असे आदेश दिल्याने अधिकारी वर्ग असलेली समिती नेमण्यात आली आहे. काही तासांचा कालावधी उरल्याने समितीचीही पळापळ सुरु आहे. आज चौकशी समिती मालगाव मध्ये सकाळी कार्यालयीन वेळेत हजर होणार असून समिती काय अहवाल देते याची प्रतीक्षा सर्वाना करावी लागणार आहे.


