कोल्हापूर प्रतिनिधी | एसटी आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. महेश तान्हाजी गायकवाड (वय २३, रा. विद्यानगर, मोहोळ) व प्रतिक अशोक शिर्के (वय २२, रा, नारळा पैठण) अशी मृतांची नावे आहेत.
हा अपघात ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या समोर झाला. या अपघतामुळे या मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर ते मुंबई ही एसटी बस ओतूरच्या दिशेने येत होती तर ओतूरहून आळेफाट्याच्या दिशेने कार निघाली होती. ओव्हरटेक करताना कारची बसला समोरासमोर धडकली बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. तर एसटीच्या समोरच्या भागाचे देखील मोठे नुकसान झाले. अपघातानंतर एसटी खोल खड्ड्यात जाऊन झाडावर आदळली. कारमधील महेश गायकवाड, व प्रतिक अशोक शिर्के हे जागीच ठार झाले. एसटीमधील १५ प्रवासी जखमी झाले.
कारमधील एकजण गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांच्या मदतीने बचाव कार्य राबवत जखमी आणि मृत नागरिकांना तातडीने वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली. या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,पोलीस हवालदार श्यामसुंदर जायभाय, मनोज कोकणी, विलास कोंधवळे, सुरेश गेंगजे, तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

