मुंबई प्रतिनिधी | कुख्यात गुंड अरुण गवळीवर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम अॅक्ट म्हणजे मोक्का (MCOCA) लागू करण्यासंदर्भातील कागदपत्रं गहाळ झाल्याची कबुली क्राइम ब्रँचकडून मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गवळी सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे.
खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 साली मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील अनेक मालमत्ता हडप करण्यासाठी लोकांना धमक्या दिल्याचा अरुण गवळी आणि त्याच्या टोळीवर आरोप आहे. पण 2013 साली मुंबईत आलेल्या पुरात कागदपत्रं गहाळ झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गेल्या महिन्यात याच कागदपत्रांवरून न्यायालयानं पोलिसांना खडसावलं होतं. गेल्या 10 वर्षांपासून कागदपत्रांमुळं प्रलंबित असलेल्या खटल्याला आपण आणखी विलंब करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं होतं.
मुंबईतील एका बिल्डरकडून 2005 साली राम-श्याम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 50 लाख रूपयांची खंडणी गवळीनं मागितली होती. त्या बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचं घर असलेल्या दगडी चाळीत येण्यास सांगितलं होतं.
बिल्डरच्या तक्रारीवरून अरूण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली गेली होती.
मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

