पोलिसांनी उध्वस्त केलेल्या ड्रग रॅकेट प्रकरणामध्ये देशभरामध्ये विविध ठिकाणी छापे सुरू आहेत. पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये देखील बुधवारी सकाळपासूनच छापेमारी केली.
सांगली मधील कुपवाड येथील स्वामी मळा परिसरामध्ये तपासणी करीत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणी तब्बल १४० किलो ‘एमडी’ आढळून आले आहे. पोलिसांनी साधारणपणे ३०० कोटी रुपयांचे हे मेफेड्रोन जप्त केले आहे.
यापूर्वी अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात कुरकुंभच्या ‘अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतून सांगलीमध्ये ‘एमडी’ पाठवण्यात आल्याचे समोर आले होते. त्याप्रमाणे सांगलीमध्ये गुन्हे शाखेची दोन पथके रवाना करण्यात आली होती. या ठिकाणावरून सुरुवातीला आयुब अकबरशहा मकानदार (वय ४४, रा. कुपवाड, सांगली) याला ताब्यात घेण्यात आले होते. सुरुवातीला त्याच्याकडून दहा किलो ‘एमडी’ मिळाले होते. अधिक तपास केला असता आणखी १३० किलो ‘एमडी’ आढळून आले. या प्रकरणात आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

