सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी व भाजपच्या १५ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मुंबईत प्राथमिक चर्चा झाली.
५ फेब्रुवारी दरम्यान, पवार यांच्या सांगली दौर्यावेळी पक्ष प्रवेश केला जाणार असल्याची माहिती गुरूवारी मिळाली. दरम्यान, राष्ट्रवादी दादा गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांची बैठक घेउन निर्णय घेण्यात येईल असे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी गुरुवारी सांगितले.
राष्ट्रवादीचे (दादा गट) शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत माजी महापौर बागवान, भाजपचे सुकाणू समितीचे सदस्य व माजी स्थायी सभापती सुरेश आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक विष्णु माने आदींसह उपमुख्यमंत्री पवार यांची मुंबईत भेट झाली. यावेळी माजी नगरसेवक माने यांनी कुपवाडमधील विकास कामाबाबत व निधीबाबत चर्चा केली. तसेच बागवान यांनी मिरासाहेब दर्ग्यातील विकास कामासाठी निधीची गरज असल्याचे सांगितले. तसेच यावेळी सांगलीत असलेल्या माजी नगरसेवकांशी भ्रमणध्वनीवरून पवार यांनी संवाद साधला.
मावळत्या महापालिकेत असलेले भाजप व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे माजी पदाधिकारी यांनी अजितदादांच्या गटात सहभागी होण्याचे निश्चित केले आहे. ५ फेब्रुवारी दरम्यान, कुपवाड येथे खो-खो स्पर्धा व स्व. मदन पाटील क्रीडांगणाचे उद्घाटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी येण्याचे कबुल केले आहे. यावेळीच पक्ष प्रवेशाचा जंगी कार्यक्रम आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याबाबत माजी महापौर बागवान यांच्याशी संपर्क साधला असता मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांची भेट केवळ विकास कामाबाबत होती, यावेळी अन्य काही राजकीय चर्चा झालेली नाही. तथापि, काही नगरसेवक आणि कार्यकर्ते यांची बैठक येत्या आठ दिवसात घेउन पुढील राजकीय निर्णय घेतला जाणार आहे असे सांगितले.

