- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक
कडेगांव:- तालुक्यातील नेवरी येथे ग्रामपंचायत कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर आज समस्त मातंग समाजाचा वतीने कार्यालयावर हलगी मोर्चा धडकला. यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालून पूजन करण्यात आले.
नेवरी ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी आण्णाभाऊ साठे प्रेमींनी त्यांची एक प्रतिमा दिली होती. मात्र ती प्रतिमा कार्यालयात दर्शनी भागात न लावता ती अडगळीच्या ठिकाणी एका प्लास्टिक ठिक्यात ठेवल्याची आण्णाभाऊ साठे प्रेमिंच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर आक्रमण तरूणांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याने कडेगांव गाठून तहसीलदार , गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दोषींवर कारवाई साठी निवेदन दिले होते.
आज गुरुवार दि.११ जानेवारी रोजी मातंग समाजातील सर्व समाज बांधवांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा घेऊन हलगी वाजवत घोषणा देत मोर्चा काढला. गावातील प्रमुख मार्गावरून सदर मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला. यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाचा धिक्कार असो ,दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर मातंग समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालण्यात आला व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. युवक काँग्रेसचे सरचिटणीस इंद्रजित साळुंखे आपले मनोगत व्यक्त करीत असताना युवकांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला. यावेळी युवक आक्रमक दिसून आले. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला.
यावेळी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, ,समता वादी महासंघाचे गणेश माने, डेमोक्रॅटिक पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सयाजी सकट, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य मनोहर सकट, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष लखन सकट, शुभम सकट, किरण सकट, पितांबर सकट यांचेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

