पुणे प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – अखिल भारतीय पोलिस बॅंड स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस दलाने दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर राज्य राखीव पोलिस बलाच्या पाईप बँड संघाने सलग सहाव्यांदा सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवला.
गांधीनगर (गुजरात) येथील पोलिस अकॅडमीमध्ये २४ व्या अखिल भारतीय पोलिस पाईप बँड स्पर्धा-२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतून पाईप बॅंडचे १३ संघ, ब्रास बँडचे १७ संघ, बिगुलचे १९ व महिला पाईप बँडचे पाच संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत बेस्ट पाईप बॅंड कंडक्टर सहायक पोलिस हवालदार जी. आर. अंधारे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. राज्य राखीव पोलिस बलाच्या बिगुल संघानेही सुवर्ण पदक पटकाविले. तसेच महाराष्ट्र पोलिस बलाच्या ब्रास बॅंड संघाने कास्य पदक मिळविले.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलिस बलाचे पाईप बँड, ब्रास बँड व बिगुल असे तीन संघ आणि ८४ पोलिस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलिस संघाने प्राचार्य राज्य राखीव पोलिस बल, प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड तथा संघ व्यवस्थापक रामचंद्र केंडे यांच्या नेतृत्वाखाली दोन सुवर्ण व एक कास्य पदकासह तीन पदके प्राप्त करून सर्वसाधारण विजेतेपद मिळवत आत्तापर्यंतची देदिप्यमान कामगिरी केली आहे. प्रशिक्षक उगलमुगले आणि कोठुळे यांच्या प्रशिक्षणाखाली सलग सहाव्यांदा पाईप बॅंड संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी अखिल भारतीय पोलिस पाईप बॅंड संघास भेट देऊन मार्गदर्शन केले. राज्य राखीव पोलिस बलाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे आणि पोलिस उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून स्पर्धकांचे मनोधैर्य उंचावले.

