सांगली प्रतिनिधी : कुपवाड परिसरात जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोराला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरुन नेल्याचे अख्ख्या सांगलीने पाहिले. मोर दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच दगावला.मात्र, अशी कोणतीही घटना घडली नाही, असा दावा वन विभागाने नागपूर अधिवेशनात केला गेला.
आमदार मानसिंगराव नाईक यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने वन विभागाचा खोटेपणा चव्हाट्यावर आल्याचा हल्लाबोल नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केला. या प्रश्नावर उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाब विचारणार असल्याचे आमदार नाईक यांनी ‘गोपनीय खबऱ्या’शी बोलताना सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुपवाड येथील पाटील मळ्यात अत्यावस्थ मोर वन विभागाचे दोन कर्मचारी टॉवेलमध्ये गुंडाळून उपचारांसाठी नेत होते. दुचाकीवरुन नेताना मोराची हेळसांड झाली आणि मोराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

मोराचा प्राण वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे जाण्याचा हा प्रकार वेदनादायक असल्याने प्राणिमित्रांसह अनेकांनी या कारभाराचे वाभाडे काढले. नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर, प्रदीप कांबळे यांनी याप्रकरणी जोरदार हल्ला केला. प्राणिमित्र संघटनेचे एड. बसवराज हौसगौडर यांनी मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्यांकडे तक्रार केली. मात्र, अद्याप उत्तर देण्यात आले नाही.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात हा तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी वनविभागाकडून अशी घटना निदर्शनास आली नाही, असे उत्तर देण्यात आल्याने वन विभागाच्या खोटेपणा समोर आला आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये घडलेल्या घटनेनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली होती. यावर त्यांनी उचीत कारवाई केली जाईल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
आमदार मानसिंगराव नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापुरचे आर.एम रामानुज यांनी दिलेली काही उत्तरे अशी,
प्रश्न : सांगली जिल्ह्यामध्ये वन्य प्राणी उपचार केंद्र नसल्यामुळे एका मोराचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे ऑक्टोबर २०२३ व त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे का ? त्यास दिलेले उत्तर पुढील प्रमाणे-‘या विभागाच्या अखत्यारित ऑक्टोबर २०२३ मध्ये वा दरम्यान अशा प्रकारची घटना निदर्शनास आलेली नाही.
प्रश्न : उक्त मोराच्या उपचारांकरिता वाहन नसल्यामुळे या जखमी मोरास दुचाकीवरुन उपचारांकरिता घेऊन गेल्याचे निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय? या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्याने ‘प्रश्न उद्भवत नाही’ असे आश्चर्यकारक उत्तर दिले आहे. याबाबत प्राणी मित्रांनी वनविभागाच्या या खोटारडेपणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

