नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : राजधानीतील गुन्ह्यांच्या घटना (crime) अद्यापही थांबलेल्या नाहीत. द्वारका परिसरात असाच एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. तिथे एका महिलेने डिलिव्हरी एजंटवर चाकूने (attacked with knife) वार केला. त्याची चूक एवढीच होती की त्याने त्या महिलेला पत्ता विचारला. गेल्या शुक्रवारी द्वारका येथील संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत डिलीव्हरी एजंट जखमी झाला आहे.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे या हल्ल्याचे वृत्त मिळताच पोलिस तेथे आले असता, त्या महिलेने पोलिस पथकातील अधिकाऱ्यांवरही हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांवरही केला हल्ल्याचा प्रयत्न
पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र तेव्हाही ती महिला इतरांना चाकू दाखवून धमकावत होती. पोलिसांनी तिच्याकडून चाकू हिसकावून घेतला मात्र तिने तेथील एक छडी घेऊन पोलिसांच्या वाहनावर हल्ल केला तसेच इतर गाड्यांचेही नुकसान केले. पोलिसांनी तिला अटक करण्यााचा प्रयत्न केला असता तिने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे केस जोरात खेचले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय महिला डीडीए फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून एकटीच राहते आणि तिचे शेजाऱ्यांसोबत अनेकदा भांडणे आणि वाद होतात. मात्र तिच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या डिलीव्हरी एजंटवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

