कडेगाव :- नेवरी ता कडेगाव येथे शनिवार दि ५ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध किर्तनकार तसेच समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती आजी माजी सैनिक संघटनेने दिली आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावरती सदर आयोजन करण्यात आलं आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिशाहीन होत चाललेल्या तरुण पिढीला उपदेशा बरोबरच सामाजिक आणि धार्मिक ज्ञान प्राप्त व्हावे तसेच त्यांच्यात देशसेवेची भावना जागृत व्हावी आणि इतर सर्व लोकांना हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे अनमोल विचार श्रवण करता यावेत या उद्देशाने सदर किर्तन सेवेचे आयोजन केले असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनीच सदर किर्तन सेवा घेण्याचे आयोजन होते मात्र तशी तारीख न मिळाल्याने सदर किर्तन सेवा शनिवार दि ५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणा वरती घेण्यात आली असल्याचे आयोजक आजी माजी सैनिक संघटनेने सांगितले.
किर्तन सेवा ठीक ७ वाजता सुरु होणार असून या सुश्राव्य अशा किर्तन सेवेचा लाभ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

