कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनीवर असताना आज कळंबा कारागृहातील सुभेदारास गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. बाळासाहेब भाऊ गेंड (वय ५५ ) असे अटक केलेल्या सुभेदाराचे नाव आहे. कळंबा कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अमली पदार्थ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरातील कळंबा कारागृह गेल्या अनेक दिवसपासून चर्चेत आहे. कारागृहात मोबाईल, सीम कार्ड आणि गांजा सारखे पदार्थ आढळवून येत होते. त्यामुळे वारंवार कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनीवर असल्याच बोललं जात होतं. त्यातच आता कळंबा कारागृहातील कर्मचारी बाळासाहेब भाऊ गेंड या कर्मचाऱ्याकडे १७१० रुपयाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ सापडल्याने पुन्हा एकदा कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
गेंड यांच्याकडे गांजा सापडल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता एकूण २३,२५० हजार रुपयांचा दोन किलो ३२५ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. तर ५०,५०० रुपयांची रोकड अशी एकूण ७३,८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महेश दिलीप देवकाते या कारागृह शिपायाने दिली आहे. कारागृहातील सुभेदारानेच हे कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

