पुणे : कठोर कायदे असूनही महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची संख्या कमी झालेली नाही. प्रगत राज्य म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आणि पुण्यासारख्या शहरात जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा महाराष्ट्रात तरी महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडतो. पुण्यात एका खासगी सावकाराने पतीसमोरच पत्नीवर बलात्कार केला. पतीला कर्जाची परतफेड करता आली नाही, म्हणून त्याने पत्नीवर अत्याचार केला. या धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरले आहे.
पुण्यातील हडपसर येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये ही घटना घडली होती. मात्र काल तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडित विवाहित महिलेने या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात आरोपी इम्तियाज हसीन शेख याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने कर्ज दिलं होतं. कर्जाचे हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. आरोपी सावकाराने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपीने दोघांना भेटायला बोलवलं व पतीसमोरच पत्नीवर बलात्कार केला. फिर्यादीच्या पतीला जागचं हलता येऊ नये आणि त्याने तिला वाचवण्यासाठी येऊ नये म्हणून आरोपीने त्याला चाकूचा धाक दाखवत, मारण्याची धमकी देत फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.
आरोपीने एवढे करून न थांबता, संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

