तासगाव (प्रतिनिधी): मणिपूर येथील हिंसाचार आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ प्रकरणी तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन देऊन मणिपूरच्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, मणिपूर येथील मानवतेला लाजविणाऱ्या व अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या चार नराधमांना अटक करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राज्यवर ताशेरे ओढलेले आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री, प्रत्यक्ष जागेवर न जाता कारवाई चे आदेश देत आहेत. तरी सदर घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत एका चौकशी आयोगाची नेमणूक करुन चौकशी करावी.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, तासगाव तालुका व शहर महिला व युवती यांचे वतीने माजी खासदार किरीट सोमय्या यांचा तीव्र निषेध करतो. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र सरकारने गृह खात्यापर्यंत ३५ व्हिडीओ क्लिपची सत्यता पडताळणी करुन ताबडतोब कारवाई करावी.
यावेळी महीला विभागाच्या अध्यक्षा नलिनी पवार, शहर अध्यक्षा शुभांगी साळुंखे, सत्वशिला पाटील, पूनम माळी, उज्वला तोडकर यांसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

