सांगली (प्रतिनिधी) : शहरातील सह्याद्री ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स प्रा. लि. च्या कंपनीने एका वर्षात रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून एका सामाजिक कार्यकर्तीसह तिघांना तब्बल ५५ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला. विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने तिघांकडून प्रारंभी ७१ लाख २० हजार गुंतवणूक करुन त्यांना १५ लाख ५७ हजारचा परतावा दिला. याप्रकरणी कंपनीच्या संचालकांसह तिघांवर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सुजाता नंदकुमार इंगळे (रा. कर्नाळ रस्ता, काकानगर सांगली ), मनोज अशोक पाटील (रा. आष्टा, ता. वाळवा ) आणि सचिन दादासाहेब यादव (रा. चोपडी, ता. सांगोला ) यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद सामाजिक कार्यकर्त्या सुनीता गजानन मोरे (रा. चाणक्य चौक, सांगली ) यांनी दिली आहे.
घटनेची माहिती अशी, शहरातील बिपीन सुपर मार्केट तसेच काँग्रेस भवन नजीक संशयीतांनी सह्याद्री ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीचे कार्यालय थाटले होते. फिर्यादी सुनीता मोरे यांना तिघांनी विश्वासात घेवून आमच्या कंपनीत पैसे गुंतविल्यास बारा महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. कमी कालावधीत आर्थिक फायदा होत असल्याचे पाहून फिर्यादी मोरे यांनी त्यांच्या बॅँक खात्याच्या माध्यमातून तसेच रोख रक्कमेव्दारे संशयीतांकडे ३३ लाख रुपये गुंतविले. व्यवहार पारदर्शी असल्याचे दाखविण्यासाठी संशयीतांनी फिर्यादी मोरे यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या सुरक्षेपोटी त्यांचे बँक खात्याचे २९ लाख रुपये किंमतीचे चार धनादेश व नोटरी करुन दिली.
तसेच फिर्यादीच्या परिचयाच्या बजरंग तुकाराम पाटील आणि महेश मासाळ यांनी देखील सह्याद्री ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीत गुंतवणूक केली. फिर्यादीसह तिघांना मिळून कंपनीने १५ लाख ५७ हजारचा परतावा दिला. परतावा दिल्यानंतर देखील बजरंग पाटील यांची १४ लाख तर महेश मासाळ यांचे १४ लाख ६० रुपये रक्कम कंपनीकडेच होती. सन २०२० साली तिघा गुंतवणूकदारांनी ७१ लाख २० हजाराची रक्कम कंपनीमध्ये गुंतवली होती. मात्र तीन वर्षानंतरही वारंवार पाठपुरावा करुनही १५ लाख ५७ हजाराच्या परताव्याव्यतिरिक्त काहीच रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिघांची एकूण ५५ लाख ६३ हजाराची फसवणूक झाल्याची फिर्याद शनिवारी उशीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

