हातकणंगले (प्रतिनिधी): हेरले येथे 4, 5 मे रोजी आणि 10, 11 जुलै रोजी झालेल्या चोरीतील संशयित आरोपीला हातकणंगले पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 40 हजार 427 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अभिषेक विलास घाडगे, समीर इलाही पटेल आणि माया विलास घाडगे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या गाव भाग फाट्याजवळ असणाऱ्या संतोष दादासो पाटील यांच्या संस्कार ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट दुकान आणि त्या लगत असणाऱ्या विद्यानंद आदगोंडा पाटील यांच्या स्वरा ऑटोमोबाईल मधील दुकानांमध्ये चार मे ते 5 मे च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एमरॉन आणि एक्साइड कंपनीच्या दुचाकी आणि चार चाकी वाहनाच्या बॅटऱ्या लंपास केल्या होत्या. त्याचबरोबर हेरले माळभाग फाट्यावरील रवी कुमार बाबासो माने यांच्या समरजीत कास्टिंग या फाउंड्रीत 10 जुलै च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ॲल्युमिनियमच्या वस्तू चोरल्या होत्या. याबाबत बातमी दाराकडून मिळाल्या माहितीनुसार दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोन्ही ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आहे.
संशयतांची नावे अभिषेक विलास घाडगे असून हा कोरोची इथल्या सरकारी दवाखान्याजवळ राहतो. तर समीर इलाही पटेल हा कबनुरातील बागडी गल्लीत राहतो. त्यांच्याबरोबर या चोरीमध्ये रोजी इथल्या सरकारी दवाखान्यासमोर राहणाऱ्या माया विलास घाडगे हिचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांच्यावरही अटकेची कारवाई करत एक लाख 40 हजार 427 रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये 220 kg वजनाचे ॲल्युमिनियम च्या वस्तू, त्याचबरोबर एमरॉन आणि एक्साइड कंपनीच्या दुचाकी आणि चार चाकीच्या बॅटऱ्या, चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली एक तीन चाकी ऑटो रिक्षा आणि एक मोटरसायकल हातकणंगले पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक रवींद्र भोसले, पीएसआय यशवंत उपराटे, हेमंत करोशी, संग्राम खराडे, अतुल निकम, संग्राम पाटील, सुहास गायकवाड, सागर पोवार यांनी केली.

