हातकणंगले/(प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी हे गाव शंभर टक्के पूरबाधित गाव म्हणून प्रशासकीय दप्तरी नोंद असून संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी मौसमी चौधरी, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी भेट देऊन पहाणी केली. गेले काही दिवस वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी संभाव्य पूर पूरस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना कोणते विभाग वाटून दिलेले आहेत त्या ठिकाणी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. संभाव्य पूर परिस्थितीत जनावरे आणि नागरिक यांना कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करायचे आहे, त्याबाबत सरपंच आणि नागरिकांशी चर्चा केली. त्याचबरोबर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाच्या संदर्भात सूचना केल्या.
नागरिकांच्या रिलीफ कॅम्प असलेल्या नवे पारगाव इथल्या पाराशर हायस्कूल या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती वडगावचे सदस्य सुभाष भापकर, सरपंच माणिक घाटगे, यांनी सूचनांबाबत माहिती दिली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. बी. जंगम, मंडल अधिकारी अमित लाड, तलाठी शैलेश कुइंगडे, ग्रामसेविका अनुपमा सिदनाळे, आरोग्य विभागाचे अधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.

