इस्लामपूर ( प्रतिनिधी ) : शिरटे (ता.वाळवा) येथे कृष्णा नदीच्या पात्रात कोळी बांधवांना मासे पकडण्याच्या जाळीत मगरीचे लहान पिल्लू सापडल्याने खळबळ माजली आहे.बहे रामलिंग बेट परिसरात मच्छिमारीसाठी सोडलेल्या जाळीत हे पिल्लू सापडले. रात्री लावलेली जाळी नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर काढली असता माश्याऐवजी मगरीचे पिल्लू दिसले.कोळी बांधवांनी त्याला व्यवस्थित बाहेर काढून सुरक्षित स्थळी ठेवले आहे.
गुंडाजी खोत, दत्तात्रय खोत अमर खोत यांनी धाडसाने जाळ्यात अडकलेल्या पिल्लांची सुटका केली. गतवर्षी बहे पुलाजवळ मगरीचे दर्शन झाले होते. त्यामुळे त्या मगरीला पिल्ले झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जाळ्यात सापडलेल्या मगरीच्या पिल्लाला बघण्यासाठी गर्दी झाली होती. वनविभागाशी संपर्क साधला असून मगरीच्या पिलाला सुरक्षित स्थळी सोडणार असल्याचे कोळी बांधवांनी सांगितले.

