सांगली ( प्रतिनिधी) : बेडग ( ता. मिरज) येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान बेकायदेशीररित्या पाडल्याबद्दल बौध्द समाज बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. विश्रामबाग येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी दोषीवर तातडीने कारवाईची मागणी केली. शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे संघर्ष चळवळ समितने मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बेडग ग्रामपंचायतीने २३ जानेवारी २०२३ रोजी ठराव करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान उभी करणेस नाहरकत दिली होती. त्यानुसार बौध्द समाज बांधवांनी लोकवर्गणीतून कमानीचे बांधकाम चालू केले होते. कमानीचे बांधकाम चालू असताना गावातील काही विघ्नसंतोषी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सदरची कमान बेकायदेशीररित्या बंद करावयास भाग पाडले. कमान २३ फूटापर्यंत उभी केली असताना ती पाडली. त्याच्या निषेधार्थ बेडग येथील सर्व बौध्द समाज व बेडकरी विचाराचे नागरिकांनी त्यांचे लहान मुले व वयोवृध्द लोकांसमवेत गांव सोडून भर पावसात बेडग ते मुंबई असा चालत प्रवास करीत आहेत. ही घटना अत्यंत निदंनीय असून आंबेडकरांनी दिलेल्या हक्क व अधिकारांची पायमल्ली करणारे आहे.
या प्रकरणी बेडग येथील संबंधीत जबाबदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पदाधिकारी असतील यांच्यावर गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी. आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास समितीचे वतीने “सांगली जिल्हा बंद” ची हाक द्यावी लागेल. त्यावेळी होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे. मोर्चाचे नेतृत्व विनायक हेगडे, अविनाश कांबळे, अश्विनीकुमार मुळके, नविनचंद मोरखाने, अमित चव्हाण, गणेश हताळे, विशाल पवार यांनी केले.

