संख (ता.जत) येथे ऊसात लागवड केलेल्या गांजा शेतीवर छापा टाकून सुमारे सव्वा लाखाचा गांजा जप्त केला आहे. हा छापा बुधवारी (दि. ६) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास टाकण्यात आला होता.
सदरची कारवाई उमदी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली या विभागांनी केली आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र बिरादार यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी राजेंद्र शिवाणा बिरादार (वय ५७), श्रीकांत शिवाणा बिरादार (वय ५६) शटगोंडा शिवाणा बिरादार (वय५८) (सर्व रा. संख) या तिघांवर गुंगीकारक अन्नद्रव्य आणि मनोव्यापावर परिणाम करणारे पदार्थ लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल संजय पांढरे यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. उमदी पोलीस ठाण्यात नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे हजर झाल्यानंतर दोनच दिवसात मोठी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी संख येथे राजेंद्र शिवाणा बिरादार व श्रीकांत बिरादार शेटगोंडा यांनी गट नंबर 210 मधील उसाच्या शेतात गांजाची ची लागवड केली आहे. याबाबतची माहिती पोलीस कॉन्स्टेबल नागेश खरात यांना मिळाली होती .त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना याबाबतची कल्पना दिली .यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मदत घेत गांजा शेतीवर छापा टाकला. यावेळी 24 किलो ओला गांजा मिळून आला या गांजाची बाजारभावाप्रमाणे सुमारे सव्वा लाख किंमत होत आहे .बुधवारी रात्री ही उशिरा कारवाई सुरू होती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ,स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, नागेश खरात, नामदेव काळेल, आप्पासाहेब हाक्के, नितीन पलूसकर, रामराव बन्नेंवर, संजय पांढरे ,प्रशांत माळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

