मिरज प्रतिनिधी / मिरजेतील झारीबाग चौकात सुशांत डायग्नोस्टिक सेंटर समोर रस्त्याच्या कडेला चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून पळवून घेऊन जाणाऱ्या चोरट्यांचा अपघात झाला. सदरचे चोरटे मिरजेतून तासगावकडे जात असताना कुमठे फाटा येथे त्यांचा अपघात झाला. मोटरसायकल वरून पडल्याने चोरट्यांचे भिंग फुटले आहे.या अपघातात चोरट्यांचे थोबाड फुटले आहे.
याप्रकरणी नबी अली गरीब हुसेन इराणी वय २२ वर्षे, रा. विजय चौक, जुना सराटी रोड, अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर व जोहेरअब्बास मैंसीन खान वय १९ वर्षे रा. टिपूनगर, तिसरी गल्ली, हरिहर जि. दावणगिरी राज्य कर्नाटक अशी चोरट्याची नावे आहेत.
कुमठे फाटा येथील अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने 108 क्रमांकावरती कॉल करून ॲम्बुलन्स मधून मिरज सिव्हील येथे उपचारा करता दाखल केले. यावेळेस हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे नाव गाव विचारले असता माहिती देण्यास टाळाटाळ केली. अपघाताची नोंद घेत पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पँटच्या खिशामध्ये चोरी केलेले मंगळसूत्र सापडले. यावरून पोलिसांच्या लक्षात आले की, महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नेचींगच्या दाखल गुन्ह्यातील हेच ते आरोपी आहेत. उपचारांनंतर चोरटे ठीक असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे.

