कडेगाव:- कडेगाव तालुक्यात नव्या शैक्षणिक वर्षात मुलांचे स्वागत थाटामाटात व गुढी उभारुन होणार आहे. पहिल्याच दिवशी मोफत गणवेश,मोफत पाठ्यपुस्तके, गोड-धोड खाऊ,वाजत-गाजत मिरवणूक त्यामुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण होणार आहे. अशा नवनवीन उपक्रमामुळे गेल्या चार वर्षात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून पटसंख्या वाढली आहे.
कडेगाव तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षापासून नवीन शैक्षणिक क्रांती सुरू झाली आहे.या शैक्षणिक क्रांतीत तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी ग्रामस्थ व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.तालुक्यातील अनेक शाळांनी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक क्रांतीची चळवळ उभी केली आहे.यात “मॉडेल स्कूल” ची झालेली निर्मिती वाखाणण्याजोगी आहे.प्रामुख्याने हिंगणगाव बुद्रुक, खेराडे- वांगी, हिंगणगाव खुर्द, उपाळे-वांगी, आंबेगाव, कडेगाव राज्य माॅडेल स्कूल नेवरी,आदी शाळांची पाहणी करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे या जिल्ह्यातून अनेक शिक्षण प्रेमी व शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीचा आलेख हा नेहमी चढता राहिला आहे. त्यात नवनवीन उपक्रमामुळे विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ व पालकांमध्ये शिक्षणाविषयीची ओढ निर्माण झाली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक शाळा स्वच्छ – सुंदर तयार करणे, इयत्ता पहिली-दुसरीसाठी चे आदर्श वर्ग, अंगणवाडीसाठी “आकार” अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे,प्रत्येक वर्गासाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे, इयत्ता चौथी व सातवी मधील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी साठी व इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जादा तासांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना घड्याळी एक तास संगणकाचे ज्ञान,
पालकांच्या जागृती निर्माण होण्यासाठी दर तीन महिन्यांनी पालक मेळावा,शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी दर तीन महिन्यांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ञांची व्याख्याने, दर सहा महिन्यांनी पंचायत समिती मार्फत शिक्षकांची आरोग्य तपासणी,आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना,कमी पटातील शाळा मॉडेल स्कूल संकल्पनेत आणण्यात येणार आहेत.
हिंगणगाव बुद्रुक, मोहित्यांचे वडगाव, खेराडे -वांगी आदी गावातून “डिजिटल डिटॉक्स”ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात आली.याच धर्तीवर यावर्षी अन्य पंधरा गावांमधून ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.त्याचबरोबर तालुका स्तरावर शिक्षकांसाठी ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व सध्याचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची “मॉडेल स्कूल” संकल्पना प्रथम प्रभावीपणे राबवणारा म्हणून कडेगाव तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे.
तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी,ग्रामस्थ, पालक व शिक्षकांच्या अविरत प्रयत्नाने “मॉडेल स्कूल”निर्मितीमध्ये मोठे यश मिळाले आहे. भौतिक सुविधांबरोबर शैक्षणिक गुणवत्तेत कडेगाव तालुका अग्रेसर ठेवण्यात यश मिळाले आहे.
–अनिस नासकवडी ,गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती,कडेगाव
ठळक वैशिठ्ये-
@ पट संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ…
@ कडेगाव व वांगी या जिल्ह्यातील मोठ्या पटाच्या शाळा..
@ सर्वात जास्त मॉडेल स्कूल असलेला तालुका..
@ डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत लक्षणीय यश….
@ एन.एम.एम.एस. परीक्षेत भरघोस यश…
@ लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक उठाव…
@ कोल्हापूर बोर्डात दहावीचा निकाल सर्वाधिक असलेला तालुका…
@ मॉडेल स्कूल दुसऱ्या टप्प्यातील शाळांची उत्कृष्ट वाटचाल…
@ सांगली,सातारा,कोल्हापूर,पुणे येथील सुमारे पाच हजार लोकप्रतिनिधी,अधिकारी,ग्रामस्थ,
व शिक्षकांच्या मॉडेल स्कूलला भेटी…
@ इयत्ता पाचवी ते सातवीतील मुले एम.एस.सी.आय.टी ची संगणक परीक्षा देणार…
@ स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनावर विशेष भर…


