सांगली: रिलायन्स ज्वेलर्स शॉपीवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.
लवकरच या दरोडेखोरांपर्यंत पोहोचू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सुनिल फुलारी यांनी आज सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सची पाहणी करत तपासाचा आढावा घेतला.
रविवारी सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा टाकून 14 कोटींचे दागिने लुटण्यात आले होते. याप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी रिलायन्स ज्वेलर्सची पाहणी करत जिल्हा पोलिसांच्याकडून तपासाचा आढावा घेतला आहे. संशयित दरोडेखोरांच्या पर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. काही महत्त्वाचे धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले आहे. या दरोड्याची उकल करण्यासाठी आंतरराज्य स्तरावर समन्वय करण्यात येतोय असेही फुलारी म्हणाले.त्याचबरोबर या दरोड्यामध्ये वापरण्यात आलेले वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर हे बनावट असल्याचं तपासात समोर आल्याचेही सुनील फुलारे यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र या गाड्यांच्या खरेदीवरून त्या कोणी खरेदी केल्या आहेत याचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर दरोडेखोरांपैकी काहीजण परप्रांतीय होते, तर एक जण मराठी बोलत असल्याचेही समोर आले आहे. दरोड्याच्या मागे ज्वेलर्स शॉपीत काम करणाऱ्या जुन्या-नव्या कर्मचाऱ्यांचा, सिक्युरिटी गार्डचा किंवा नोकरी सोडलेल्या कोणत्या व्यक्तीचा सहभाग आहे का? यादृष्टीनेही पोलिसांचा तपास होईल असं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी स्पष्ट केले आहे. आरोपी वाहन सोडून पायी निघून गेलेत, पण आरोपी तिथून पुढे नेमके कुठे गेले आणि कोणत्या दिशेने गेलेत याचाही तपास सुरू आहे.

