कडेगाव:- जनमानसांचा विरोध डावलून जबरदस्तीने टोल नाका सुरू केल्यास तो शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांचे नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलने फोडण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे युवासेना तालुका प्रमुख राहुल चन्ने यांनी दिला आहे. ते दै प्रतिध्वनी शी बोलत होते.
यावेळी चन्ने पुढं म्हणाले,विजापूर गुहागर महामार्गावर कडेगाव तालुका हद्दीत उभारण्यात येत असलेल्या टोल नाक्यास जनमानसातून प्रचंड विरोध आहे. या महामार्गाचे काम व्यवस्थित झालं नाही. अनावश्यक गतिरोधक टाकल्याने दुचाकी स्वारांना मणक्याचे आजार उदभवू लागले आहेत. महामार्गाच्या दुतर्फा झाडी लावलेली जळून गेली आहेत याकडं अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. सुरली घाट चारपदरी करण्याचं आश्वासन दिलं असताना तो सध्या दोनच पदरी सुरू आहे. मुख्य महामार्ग पलूस कवठेमहांकाळ मार्गे झाला असताना टोल नाका कडेगाव तालुक्यात का ? असे विविध कारणे या टोल नाका विरोधासाठी आहेत. आम्ही याबाबत कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांना रीतसर निवेदन दिलं असतांना ठेकेदार जबरदस्तीने विरोध डावलून टोल नाका सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.
जनविरोध डावलून टोल नाका सुरू केल्यास आमचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे गट) तो टोलनाका फोडेल आणि यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.

