कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील तहसीलदार आणि प्रांताधिकारी या दोघांच्याही बदल्या झाल्या आहेत. कडेगावच्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांची गगनबावडा येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रिसोड येथील अजित शेलार यांची बदली करण्यात आली आहे. तर प्रांताधिकारी गणेश मरकड यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी नगर विकास प्राधिकरण आकुर्डी येथे प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी बदलले आहेत. नवीन प्रांताधिकाऱ्यांचा अजून आदेश झाला नसल्याने त्यांचा कार्यभार विटा प्रांताधिकारी यांचेकडे अतिरिक्त सोपवण्यात आला आहे. असे असले तरी तालुक्यातील आव्हाने मात्र अजूनही तीच आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अवैध वाळू तस्करीचा तालुका म्हणून असणारी कडेगाव तालुक्याची ओळख पुसणे नवीन अधिकाऱ्यांसमोरील प्रमुख आवाहन असणार आहे.
माजी मंत्री स्व.डॉ पतंगराव कदम यांनी तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर कडेगावला प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, न्यायालय, पोलीस ठाणे यासह सर्व कार्यालये उभारली. कडेगाव तालुक्यात ताकारी आणि टेम्भू सिंचन योजनांचे पाणी फिरलं आणि तालुका सुजलाम सुफलाम झाला.
तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू स्व. कदम यांनी राजकारण केलं. सध्या प्रशासकीय बदल्यांचे वारे सुरू आहे. यामध्ये कडेगावचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या आहेत. तालुक्याचे प्रमुख अधिकारी बदलले असले तरी तालुक्यातील काही आव्हाने अजूनही तशीच आहेत.
सातबारा संगणकीकरणाची अमलबजावणी सुरू होऊन जवळपास सात वर्षे होत आली तरीही आजअखेर तालुक्यातील १०० टक्के सातबारा संगणकीकृत झाला नाही. प्रत्येक गावात सातबारा मेळ बसत नाही, क्षेत्र दुरुस्ती,नावच नाही तर नावात चूक अशी प्रकरणे घेवून शेकडो शेतकरी तालुक्याला आलेले दिसतात. पुरवठा विभागातील रेशनकार्ड ऑनलाइन साठी अजूनही ग्रामस्थ तालुक्याला आलेले दिसतात काही महिन्यांपासून या विभागाला शिस्त लागल्याचं पहावयास मिळत आहे. रस्ता केस आणि कुळ वहिवटीच्या केसेस मध्ये गती येणे महत्वाचे आहे.
तालुक्याला येरळा नदीचा सहवास लाभला आहे. या येरळा नदीतून अवैध वाळू उपसा हे सर्वात मोठं आव्हान नवीन अधिकाऱ्यांसमोर असणार आहे. तालुक्यातील बेसुमार अवैध उपसा रोखण्यासाठी भरारी पथके नेमली असली तरी काही ठराविक भरारी पथकांच्या दिवशी हमखास वाळू उपसा चालतो हे जगजाहीर आहे. तसेच तालुक्यातील ठराविक गावांमध्येच अवैध वाळू उपसा राजरोसपणे चालतो हे ही जगजाहीर आहे.एकूणच तालुक्यातील अधिकारी बदलले असले तरी नवीन अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने मात्र जुनीच असणार आहेत. आता त्या आव्हानांना हे अधिकारी कसे हाताळतात हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

