सांगलीतील जतमध्ये भाजप नगरसेवकाची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. विजय ताड असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची ईनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा तपास करत आहेत.
आधी गोळ्या घातल्या मग डोक्यात दगड घातला
विजय ताड हे जत येथील भाजपचे नगरसेवक आहेत. ताड हे शुक्रवारी दुपारी सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळून आपल्या इनोव्हा कारने चालले होते. यावेळी अज्ञातांनी त्यांची कार अडवली. यानंतर आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. घटना उघड होताच परिसरात एकच गोंधळ उडाला.
हत्येचे कारण अस्पष्ट
ताड यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आणि कुणी हे स्पष्ट नाही. पोलीस तपासाअंती सर्व उघड होईल. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमी आहे. पोलीस घटनास्थळी दाखल असून, पुढील तपास करत आहेत.

