तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी
तासगाव तालुक्यातील वायफळे येथील उरुसास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने मानाचा बैलगाडा पळवला जातो. या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात झाला. गाडा पळवत असताना एक बैल घसरून पडला. तो 100 ते 110 फूट फरफटत गेला. याचवेळी गाड्यातील लोकांनी बाहेर उड्या मारल्या. या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला आहे. तर फरफटत गेलेल्या बैलालाही जखम झाली आहे. तत्पूर्वी बैल गाड्यासह रस्ता सोडून दुसरीकडे गेल्याने काही दुचाकींचेही नुकसान झाले आहे.
वायफळे येथील हिंदू – मुस्लिम बांधव एकत्रित येऊन पीर गैबीसाहेब यांचा उरूस उत्साहात साजरा करतात. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गंध व पीर गैबीसाहेब यांचा नैवेद्य पार पडला. आज रात्री तमाशाही होत आहे. तत्पूर्वी आज (मंगळवारी) सायंकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून मानाचा गाडा पळवण्यात आला.
या गाड्याचा मान कडेमळा येथील भाविकांना आहे. त्यानुसार सायंकाळी हा गाडा सजवून गावात आणण्यात आला. सायंकाळी चार बैल जुंपलेला हा गाडा प्रमुख रस्त्यावरून सोडण्यात आला. गाड्याचा पुढे काहीजण पळत होते. गाड्याचा आडवे कोणी येऊ नये, याची काळजी घेतली जात होती. हा गाडा पहायला रस्त्याच्या दुतर्फा शेकडो लोकांनी गर्दी केली होती.
हा गाडा तलाठी कार्यालयासमोर आल्यानंतर गाड्याचे बैल भरकटले. ते रस्ता सोडून दुसरीकडेच गेले. तेथील दुचाकी रस्त्यावर पडल्या. या दुचाकींचे थोडेफार नुकसान झाले. त्यानंतर हा गाडा पळत बसस्टँडच्या दिशेने आणण्यात आला. बसस्टँडवरून तो पुढे जात असताना अचानक एक बैल कोसळला. इतर 3 बैलांनी त्याला जवळजवळ 100 फूट फरफटत नेले. याचवेळी गाड्यातील लोकांनी खाली उड्या मारल्या. यामध्ये बैल व एकजण जखमी झाला आहे.
उरुसाच्या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात…!
वायफळे येथील उरुसाच्या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात झाला. मागील वर्षीही गाड्याचा जू तुटल्याने अपघात झाला होता. यावर्षीही गाडा ओढणारा बैल कोसळल्याने अपघात झाला. यामध्ये बैलासह एकजण जखमी झाला आहे.

