कडेगाव:- येतगाव तालुका कडेगाव येथील सर्व सेवा सोसायटीचा कारभार गेली जवळपास २ महिन्यांपासून सचिवा विना सुरू असुन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी मागणी करून ही आजअखेर याठिकाणी सचिवांची नेमणूक करण्यात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय अपयशी ठरले असून फक्त पत्रव्यवहार करण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सचिव नसल्याने पीक कर्जे नूतनीकरण पूर्णपणे खोळंबले असून शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, १९ जानेवारी २०२३ रोजी येतगाव सोसायटीच्या सचिवांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी तत्काळ दुसऱ्या सचिवांची नेमणूक करावी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पत्र पाठवले होते. याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाने वरिष्ठांकडे कळवले. त्यानंतर गावातीलच एक सचिव इतर ठिकाणी सेवेत आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार द्यावा म्हणूनही पत्र पाठवले शिवाय पदाधिकारी सहाय्यक निबंधक यांना कार्यालयात प्रत्यक्ष भेटले परंतु सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून इतर दुसऱ्या सचिवांचा आदेश काढण्यात आला.संबंधित सचिवांनी कार्यभार घेण्यास नकार दर्शवला. त्यानंतर दुसऱ्या सचिवांना आदेश देण्यात आला मात्र त्यांनीही कार्यभार स्वीकारला नाही. यात जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे मात्र आजअखेर सोसायटीला सचिव नाही. सहाय्यक निबंधक कार्यालयाशी गोपनीय खबऱ्या ने संपर्क साधला असता ज्या सचिवांचा आदेश कार्यालयाने काढला असल्याचे सांगितले त्यांनी आपण कार्यभार घेणार नसल्याचे खबऱ्या ला सांगितले. सध्या ऊसतोड सुरू आहे शिवाय बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस गेला आहे. ऊस बिले जमा झाली आहेत त्यातून पीक कर्जे लिंकिंगने जमा करण्यात आली आहे मात्र त्यांचे नूतनीकरण शिवाय उर्वरित रक्कम बचत खात्यावर जमा करण्याचे काम पूर्णपणे थांबले आहे.
येतगाव सोसायटी मध्ये जवळपास ३०० सभासद असून चार कोटींच्या जवळपास आर्थिक उलाढाल आहे. तरी याबाबत जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांनी तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी व येतगाव सोसायटी मध्ये सचिवांची नेमणूक करावी अशी मागणी सभासद शेतकऱ्यांमधून होत आहे.
आमच्या सोसायटीचे सचिवांना १९ जानेवारी रोजी निलंबित करण्यात आलं आहे तेंव्हापासून आजअखेर याठिकाणी सचिव नाहीत. लोकांची पीक कर्जे नूतनीकरण प्रक्रिया खोळंबली आहे. सभासद शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पदाधिकारी या नात्याने सभासद आम्हाला जाब विचारत आहेत त्यामुळं याठिकाणी लवकरात लवकर सचिव नेमणूक करावी.
सदानंद जगन्नाथ सावंत
अध्यक्ष येतगाव सर्व सेवा सोसायटीआम्ही वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले आदेश सचिवांना पुढं दिले होते मात्र तरीही आजअखेर येतगाव सोसायटी मध्ये कोणीही कार्यभार स्वीकारला नसल्याचे समजले याबाबत शुक्रवारी सर्व सचिवांची बैठक बोलावली असून या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे अन्यथा संबंधितांवर कार्यवाहीचा प्रस्ताव या कार्यालयाकडून पाठवण्यात येणार आहे.
दिपाराणी कोळेकर
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कडेगाव

