मिरज प्रतिनिधी/ शहरातील महाराणा प्रताप चौकात शिवसेनेचे दोन्ही गटात वाद झाल्याने एकच खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मिरजेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन तातडीने वाद मिटवण्यासाठी सांगितल्याने वादावर पडदा पडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाणाचे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. या आदेशाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते महाराणा प्रताप चौकात एकत्र आले होते. यावेळी या गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचा निषेध करण्यात येत होता. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी आले. दोन्ही गट आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी व बाचाबाचीचा प्रकार सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होण्या अगोदरच मिरज शहर पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने या वादावर पडदा पडला.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या निषेधामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, सुनिता मोरे, जिल्हाप्रमुख सुजाताई इंगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

