सांगली: खबऱ्या प्रतिनिधी : काँग्रेसच्या कार्यक्रमात भाजपा खासदाराने थेट काँग्रेसच्या माजी मंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांना भाजपात येण्याची जाहीर ऑफर दिली आहे.
खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांसह उपस्थित दिग्गज नेत्यांना भाजपामध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तर खासदारांच्या या ऑफरमुळे पुन्हा एकदा विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार का ? या चर्चेला आता उधाण येणार आहे. सांगली शहरातल्या सिव्हील चौकाला स्वर्गीय पतंगराव कदम असे नामकरण करण्यात आले आहे. याचा उद्घाटन सोहळा कामगार मंत्री सुरेश खाडे, भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
सर्वपक्षीय आयोजित या कार्यक्रमांमध्ये भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी बोलताना व्यासपीठावर असणारे काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना थेट भाजपामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.
देश कुठे चाललाय याचं भान ठेवून विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी आपल्यासोबत येण्याचा विचार करावा, अशा शब्दात व्यासपीठावरून उपस्थित सर्व काँग्रेस नेते मंडळींना काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाजपात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
त्याचबरोबर हे बोलल्याने ,आता माझे हितशत्रू अधिक जागरुक होतील, पण घाबरणारा संजयकाका पाटील कसला, दोन हात करने आपला स्वभाव आहे. त्यामुळे मी कशाची फिकीर करत नाही असं म्हणत भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांना अप्रत्यक्ष इशारा देखील दिला आहे.

