मिरज : म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पसार सावकारांचा कसून शोध सुरू आहे. घेतलेले पैसे अंधश्रद्धेपोटी काही मांत्रिकांना दिल्याचे तपासात पुढे आले आहे.
त्यानुसार ‘त्या’ मांत्रिकाच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. सांगलीसह अन्य जिल्ह्यांतही छापेमारी करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची सात पथके पसारांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिस तपासातील आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मृत पोपट यल्लाप्पा वनमोरे व डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे हे दोघे भाऊ पाच वर्षांपासून मांत्रिकाच्या आहारी गेले होते. तत्पूर्वी, डॉ. वनमोरे यांची प्रॅक्टिस चांगली सुरू होती. त्यांची मिळकत चांगली असल्यामुळे पतसंस्थेत ठेव पावत्याही केल्या होत्या. परंतु, मांत्रिकाच्या नादी लागल्यानंतर दोघा भावांना पैशांची चणचण भासू लागली. त्यामुळे सावकारांकडून; तसेच ओळखीच्या मंडळींकडून कर्ज व उसने पैसे घेतले. त्यांनी कोणत्याही व्यवसायासाठी पैसे घेतले नसून केवळ मांत्रिक व अंधश्रद्धेपोटीच्या विधीसाठी पैसे घेतल्याचे तपासात पुढे येत आहे. परिसरातील काहींना विचारणा केली असता याबाबत माहिती ही पुढे आली आहे. त्यानुसार पोलिसांनी तो धागा पकडत तपास सुरू केला आहे. मांत्रिकांची माहिती समोर येत असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, प्राथमिक चौकशीनंतर नऊजणांच्या आत्महत्येप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी १८ जणांना अटक केली आहे; तर अन्य संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यासाठी गुन्हे अन्वेषण व मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर हे तपास करत आहेत. आज पोलिस पथकाने परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यामध्ये त्या दिवशीच्या परिसरातील हालचालींचा शोध घेतला जात आहे.

