मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; निर्माण कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या मिरज येथील निकृष्ट रस्ते कामाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंपनीस काळ्या यादीत टाकावे.कंपनीचा व्यवसाय परवाना रद्द करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.
मनसेचे जिल्हा संघटक संकेत झुरे, शहराध्यक्ष विनय पाटील व सचिव सागर चव्हाण यांनी हा इशारा दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन मनसेच्यावतीने कोल्हापूर येथे प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.त्यांनी निवेदनात असे म्हटले आहे की, मिरज येथील मिरज ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काम अनियमित, अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन पद्धतीने सुरू आहे. हे काम कोणत्याही नियमानुसार होताना दिसून येत नाही.
याबाबत वेळोवेळी कळवले आहे. तरीही दखल घेतली नाही.त्यामुळे या कंपनीस जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचा प्रकार आहे.याप्रश्नी आंदोलन हाती घ्यावे लागेल,असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.