सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प निविदा मंजुरीवरुन सांगली भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे.
या निविदेला सदस्यांचा, २ आमदारांचा आणि खासदारांचा विरोध असतानाही मंजूर केल्याच्या आरोपांवरुन स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. मात्र या वादावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. या निविदेवरून स्थायी समितीत नेमकी काय चर्चा झाली आणि निरंजन आवटी यांनी सादर केलेला खुलासा यावर सविस्तर अहवाल चंद्रकांत पाटील यांना सादर केला जाईल, असे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महापालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी घनकचरा प्रकल्पासाठी ६० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. या कामासाठी गुजरात अपोलो इंडस्ट्रीज या कंपनीची सर्वांत कमी दराची निविदा होती. ही निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आली. पण त्याला भाजपच्या खासदारांसह, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. ही निविदा लोकहिताची नसल्याची भूमिका घेत फेरनिविदेचा ठराव स्थायी समितीत करण्यात आला. कालांतराने हा ठराव आयुक्तांनी विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला होता. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
मात्र त्याआधीच ११ मार्च २०२२ रोजी सभापती निरंजन आवटी यांनी ‘स्थायी’त काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना सूचक, अनुमोदक करून ऐनवेळचा ठराव करून निविदा प्रक्रिया मंजूर केली असा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावरुन भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष शिंदे-म्हैसाळकर यांनी सभापतींना नोटीस बजावून खुलासा मागविला. गुरुवारी आवटी यांनी शिंदे व गटनेते विनायक सिंहासने यांच्याकडे खुलासा सादर केला. ही निविदा जनतेच्या हिताचीच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याचवेळी ‘स्थायी’तील पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
आता सभापतींच्या खुलाशावर जिल्हाध्यक्षांकडून अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल दोन दिवसांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर तेच याबाबतच अंतिम निर्णय घेणार आहेत. भाजपच्या दोन आमदारांनी विरोधाची भूमिका घेतली असताना त्यांना बेदखल करीत सभापतींनी योग्य तो इशारा दिला आहे. त्यामुळे हा संघर्ष वाढतच जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

