खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा घेण्यात आला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, मंडलाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील एकूण २२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी केले. या निर्णयामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महसूल विभागात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासूनच बदल्यांची प्रक्रिया अपेक्षित होती. मात्र, विविध शासकीय उपक्रम, योजनांची अंमलबजावणी तसेच सातारा- सांगली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी लागू झालेली आदर्श आचारसंहिता यामुळे बदल्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर जनगणना आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण अर्थात एसआयआर मोहिमेमुळेही बदल्यांबाबत अनिश्चितता कायम होती.
दरम्यान, पुणे महसूल विभागातील पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील बदल्यांनाही अंतिम मंजुरी देण्यात आली.
या प्रक्रियेत ३९ सहाय्यक महसूल अधिकारी, ३५ महसूल सहाय्यक, १९ मंडलाधिकारी आणि १३० ग्राम महसूल अधिकारी दर्जाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्याच्या पदावरून हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतरच कार्यमुक्त करण्यात येणार आहे. याबाबतचे स्वतंत्र कार्यमुक्ती आदेश नंतर जारी करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

