खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांपैकी पाच पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलले आहेत. शहर पोलिस दलातील एकूण १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. आज गुरूवारी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. त्यानुसार पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.
सोलापूर शहरातील विजापूर नाका, सलगर वस्ती पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा कार्यकाळ संपला होता. तर सदर बझार, एमआयडीसी, जेलरोड पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची खांदेपालट केली. दक्षिण वाहतूक शाखा, महिला सुरक्षा कक्ष, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सायबर पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, वेल्फेअर येथील प्रभारी अधिकारी बदलले आहेत. यात दुय्यम पोलिस निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.
शहर पोलिस आयुक्तालयातील अन्य शाखा तथा विभागांमध्ये प्रभारी म्हणून काम करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना व पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षक म्हणून काम करणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व विकास देशमुख यांची विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील ७ पोलिस ठाण्यांचे प्रभारी असे…
१) सदर बझार : अजित लकडे
२) विजापूर नाका : सुहास चव्हाण
३) एमआयडीसी : भाऊसाहेब बिराजदार
४) जेलरोड : उदयसिंह पाटील
५) सलगर वस्ती : श्रीशैल गजा
६) फौजदार चावडी : महादेव राऊत
७) जोडभावी पेठ : सुरज मुलाणी
‘या’ अधिकाऱ्यांच्याही बदल्या
दादा गायकवाड (आर्थिक गुन्हे शाखा), विजय खोमणे (दक्षिण वाहतूक शाखा), भालचंद्र ढवळे (सायबर सेल), उमाकांत शिंदे (विशेष शाखा), जयदीप कळेकर (जेलरोड, दुय्यम पोलिस निरीक्षक), आसिफ राजा शेख (महिला सुरक्षा कक्ष), संगीता पाटील (एमआयडीसी, दुय्यम निरीक्षक), स्नेहा म्हेतर (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष), वैष्णवी पाटील (वेल्फेअर), रविंद्रनाथ भंडारे (सदर बझार, दुय्यम पोलिस निरीक्षक), विकास देशमुख (फौजदार चावडी, दुय्यम पोलिस निरीक्षक) अशा अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

