खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १ लाख ६० हजार रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलसह एका पोलिस पाटलाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी लाचलुचपत विभागातील सांगलीचे पोलिस निरीक्षक योगेश रमेश चव्हाण (वय ३८) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम विठ्ठल घोदे (वय ४०) पोलिस कॉन्स्टेबल आणि काशीराम कृष्णा माने (वय ३६) पोलिस पाटील यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित) मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी मुचंडी गावाजवळील आर.आर. ढाबा परिसरात पडताळणी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत तक्रारदार यांच्या भाऊ आणि पुतण्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी दोन लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीनंतर ही रक्कम १ लाख ६० हजार रुपयांवर निश्चित केली.
ही रक्कम पोलिस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगण्यात आल्याचेही चौकशीत समोर आले आहे. तसेच, काशीराम माने यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्यासाठी प्रवृत्त केले आणि विक्रम घोदे यांच्या सांगण्यावरून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पडताळणी दरम्यान गोळा झालेल्या पुराव्यांच्या आधारे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
२९ रोेजी सापळा रचून केली कारवाई
याप्रकरणात प्रत्यक्ष लाचेची रक्कम जप्त झालेली नसल्याची नोंद आहे. याप्रकरणी २९ जून रोजी सापळा रचला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास कारवाई झाली. ३० जून रोजी मध्यरात्री १२ नंतर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मंगळवारी दुपारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

