खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा करत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका जाहीर केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक जवळच्या कार्यकर्त्यांचा पराभव झाल्याचा उल्लेख करत निंबाळकर म्हणाले की, आम्ही लोकांच्या कामात कधीही कमी पडलो नाही. मात्र सत्तेच्या प्रभावामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करता यावे यासाठी आम्ही शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. या प्रकरणात न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा असल्याचे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. या प्रकरणात सीबीआय उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना निंबाळकर यांनी संयमित भूमिका घेतली. “मी ठाकरे कुटुंबाबद्दल कधीही चुकीचे बोलणार नाही,” असे सांगत त्यांनी माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत झालेल्या ट्रोलिंगचा उल्लेख करत त्यांनी कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका करणे अयोग्य असल्याचे म्हटले.
पक्षांतराचा निर्णय पवनराजे प्रकरणातील निकालाशी जोडला जात असल्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “जर पक्षांतरामुळे निकाल आमच्या बाजूने लागणार असता, तर २०२२ मध्येच निर्णय घेतला असता. हा निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी नसून मतदारसंघाच्या हितासाठी आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या पुढील राजकीय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच त्यांच्या निर्णयाचा इतर नाराज लोकप्रतिनिधींवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अखेर मोठी घोषणा केली आहे. “आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असून यापुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत”, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
आताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक जवळचे कार्यकर्ते पराभूत झाले आहेत. आम्ही कधीही लोकांच्या कामात कमी पडलो नाहीत. पण दुर्देवाने सत्तेमुळे आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. सर्वसामान्य माणसांच्या कामासाठीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहोत. आज आम्ही निर्णय घेतला आहे की शिवसेना (शिंदे) पक्षात आम्ही जाणार आहोत. यापुढे आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार आहोत”, अशी घोषणा ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाची २० वर्ष न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. या निकालातून आम्हाला फार अपेक्षा होत्या. पण जो काही निकाल आला, तो अतिशय दुर्देवी आहे. या सर्व प्रकरणात एक माणूस खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा होता. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यानंतर त्यांनी अमित शाह यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. तेव्हा आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की २० वर्षांपासून आम्ही न्याय मागत आहोत, तो न्याय आम्हाला मिळावा. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वत: समोर येऊन त्याबाबत सांगितलं. आता सीबीआय या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळावा”, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

