खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मुख्य सूत्रधार नीलेश गडदे, अतुल वायदंडे, संदेश उर्फ सँडी घागरे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या खूनप्रकरणी आणखी एका अल्पवयीन युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. खूनप्रकरणात फरारी असलेल्या किरण लोखंडे व विशाल चौगुले या दोघांचा शोध सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
वेदांत बंडगर या निष्पाप मुलाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार नीलेश गडदे, अतुल वायदंडे, संदेश उर्फ सँडी घागरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर खूनप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित सागर चौगुले याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खून प्रकरणात नाव निष्पन्न झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले होते. त्याची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर खुनावेळी नीलेश गडदे याच्याबरोबर मोटारीत असल्याच्या संशयावरून आणखी एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले आहे.
खून प्रकरणातील गडदे याचे साथीदार किरण लोखंडे, विशाल चौगुले हे दोघेजण अद्याप पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक झाडे यांनी सांगितले.



















