खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज शहरातील प्रमुख चौक म्हणून ओळख असणाऱ्या शहर पोलीस ठाण्याच्या दारात अर्थातच आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हायमास्ट स्ट्रीट लाईटखाली चारचाकी वाहने पार्किंग होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
छत्रपती शाहू महाराज चौकातून पोलिस ठाण्याकडे येणारी वाहने, आणि एस टी स्टँड परिसरातून शहर पोलिस ठाण्याकडे येणारी वाहने तसेच लक्ष्मी मार्केट कडून ये-जा करणारी वाहने या चौकात एकत्रित येत असल्याने इथे गर्दी होत असते. याशिवाय पोलिस ठाण्यात येणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यासाठी वळण घ्यावे लागते. अशा स्थितीत या चारचाकी वाहनांच्या आडून पलिकडील बाजू दिसून येत नसल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा तसेच दुचाकी वाहन चालकांचे अपघात सातत्याने पहावयास मिळत आहेत.
वाहतूक नियंत्रण शाखेकडून यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वाहतूक नियंत्रण शाखा, मिरज या पोलिस दलाच्या विभागासमोरच अपघातांचे दैनंदिन दृश्य सातत्याने घडत असल्याने पोलिसांकडून कार्यवाही करण्यासाठी आता मिरजकर नागरिक अपेक्षा ठेवत आहेत.
मिरज शहरात वाहतूक सुरळीत चालण्यासाठी पोलिस नेहमीच प्रयत्नशील आहेत. परंतु, आता पोलिस ठाण्याच्या दारातच रोजच्या अपघातांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांची ही डोकेदुखी झाली आहे. याबाबतीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी त्वरित लक्ष देऊन चौक मोकळा करावा अशी मागणी सातत्याने होत आहे.

