खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे पडसाद उमटताच आणि पोलिसांच्या संभाव्य कारवाईच्या धास्तीने शहरातील बहुतेक कॅफे चालकांनी शटर खाली ओढून पलायन केले.
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध कॅफेंवर धडक मारली. विश्रामबाग येथील ‘एसपी’ ऑफिससमोरील कॉम्प्लेक्स, महावीर उद्यान आणि विलिंग्डन महाविद्यालयासमोरील कॅफेंची तपासणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच अवैध कॅफेंनी विळखा घातल्याचे आणि तेथे चोरीछुपे गैरप्रकार सुरू असल्याचे संघटनेने पोलिसांना दाखवून दिले, ज्यामुळे पोलिसही निरूत्तर झाले होते.
महावीर उद्यानासमोरील एका तळघरातील कॅफेत तसेच विलिंग्डन कॉलेजसमोरील एका कॅफेच्या पोटमाळ्यावर पडदे टाकून, छोटे बिछाने व टेबल लावून युगुलांसाठी बसण्याची सोय केल्याचे कार्यकर्त्यांना आढळून आले. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित कॅफे चालकाला सज्जड दम दिला आणि पडदे तत्काळ काढून टाकण्यास सुनावले.
‘हे’ कर्मचारी चर्चेत : नावं पालकमंत्र्यांकडे.!
विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या कॅफे आणि इतर अवैध व्यवसायाचे मोठे हप्ते पोलिसांना असून त्याचे मंथली कलेक्शन हे पोलिस ठाण्यातील ३ कर्मचाऱ्यांकडे असून त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले यांनी केली आहे.
गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमची ढीगभर पाकिटं..!
विश्रामबाग येथील आलदर चौकाजवळील एका कॅफेचालकाने शटर बंद करून पळ काढला होता, मात्र त्याच्या कॅफेच्या बाहेरच गर्भनिरोधक साहित्याचा खच पडल्याचे कार्यकर्त्यांनी पोलिसांना दाखवून दिले. तसेच, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कॅफेमध्ये कार्यकर्त्यांनी पोलिसांसह झडती घेतली असता, तेथेही गर्भनिरोधक साहित्य सापडले.
सांगलीतील बेकायदा कॅफेवरती पोलिसांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे या कॅफेंना महापालिकेकडून परवानगी देण्यात आली होती का याची माहिती मागविलेली आहे. याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
– सुधीर भालेराव, पोलिस निरीक्षक विश्रामबाग

