कुपवाड | १९ जून २०२६ : शांत कॉलनी परिसरातील एका बंद पत्राशेडमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर कुपवाड पोलिसांनी गुरुवारी (१८ जून) रात्री छापा टाकला.
बिगरपरवाना स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळणाऱ्या ७ जणांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईत कुपवाड पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ३ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुजित विलास माने (वय ३२, रा. शांत कॉलनी, कुपवाड), तौफिक मुबारक मुल्ला (वय २६, रा. मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड), आदर्श पोपट होवाळ (वय २५, रा. मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड), दिग्विजय राजाराम पाटील (वय ३९, रा. बुधगाव, मिरज), निलेश किरण पाटील (वय १९, रा. आनंदनगर, कुपवाड), इरफान मुसा मुल्ला (वय ३३, रा. वसंत नगर, कुपवाड), केरबा बापू मेटकरी (वय २८, रा. सिद्धनाथ कॉलनी, कुपवाड) अशी पोलिसांनी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांत कॉलनी येथे राहणारा सुजित विलास माने याच्या घराशेजारील एका बंद पत्राच्या शेडमध्ये काही लोक एकत्र येऊन पैशांवर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार . पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रवीण मोहिते व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात आरोपी टेबलभोवती खुर्च्यांवर बसून हातात तीन पत्ते घेऊन, समोर भारतीय चलनी नोटा ठेवून बेकायदेशीरपणे जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि आरोपीं जवळील रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अंमलदार प्रवीण मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.



















